व्यसन
व्यसन म्हणजे एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही.
कोणतीही व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी मद्यसेवन करत नाही. काल्पनिक अथवा खर्याखुर्या प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी दारु किंवा अंमली पदार्थांचा वापर केला जातो.
पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत या आणि अशा काही कारणांमुळे ‘व्यसनाधीनता’ हा मानसिक रोग होतो.
व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला आत्ताच जर थांबवलं नाही, तर कितीतरी कोवळे युवक आणि युवती नव्या शतकाचा पहिला उगवता सूर्य बघण्यासाठी शिल्लकच राहणार नाहीत. तेंव्हा मित्रहो सावध व्हा. आता तरी जागे व्हा आणि या देशाला विनाशक मार्गांकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करा.
मेंदूला बधिर करणा-या कोणत्याही मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारी व्यक्ती म्हणजेच ‘व्यसनी’ व्यक्ती. ही व्यक्ती स्वत:च्या पायाने एक एक पायरी उतरत मृत्यूच्या गर्तेत एके दिवशी संपून जाणार आहे. मादक पदार्थ म्हणजे तंबाखु, सिगारेट, दारु, गांजा, चरस, झोपेच्या गोळ्या इत्यादी. अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन करणार्या व्यक्तीला `व्यसनी’ ही पदवी प्राप्त होते. व्यसनी व्यक्ती स्वत: विनाशाकडे जातच असते आणि त्याबरोबर बायको, मुलं, आप्तपरिवार, मित्र मंडळी अशा अगणित कुटुंबांना दु:खात लोटत असते. मु़ख्य म्हणजे याची जाणीव त्याला असली तरी त्याचा नाईलाज असतो. इतका तो व्यसनाच्या आहारी जाऊन हतबल झालेला असतो. यालाच म्हणायचं व्यसनापायी ओढावून घेतलेली ‘मानसिक गुलामगिरी.’
या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर या विनाशकारी वादळाची तीव्रता किती भयंकर आहे हे कळते. फक्त इच्छा शक्तीच्या बळावर दारु सुटू शकत नाही, त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसेच योग्य औषधोपचारांची साथ हवी. प्रत्येक गावात समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाच्या जाळयात अडकलेली युवा पिढी या महान देशाचा गाडा ताकदीने ओढून एकविसाव्या शतकात पदार्पण करण्यास खरोखर समर्थ होणार आहे काय?