Need for rehab center
व्यसनाधीन व्यक्तीला शक्य तितक्या लवकर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती करणे हाच उपचार खर्या अर्थाने प्रभावी आहे.
कारण घरात राहून एखाद्याचे स्वातंत्र्य नष्ट करणे वाटते तितके सोपे नाही. त्याची मित्र संगत तोडणे, चालू वातावरणात संपूर्ण बदल करणे, प्रसंगी कठोर वागणे आणि रुग्णास त्याच्या व्यसनापासून दूर ठेवणे फक्त व्यसनमुक्ती केंद्रातच शक्य आहे. व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला मनन करण्याची, पश्चातापाची संधी मिळते, वेळ मिळतो. सतत व्यसनाधीन असल्याने असा वेळ त्याला कधी मिळालेला नसतो. या कालावधीत रुग्णाचे मनपरिवर्तन करण्यास मदत होते. त्याला चांगले आणि वाईट यातील फरक तज्ञ व्यक्तींमुळे समजावला जातो. औषधोपचाराबरोबरच त्याची दिनचर्या चाकोरीबद्ध केली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे अंमली पदार्थ न मिळाल्याने पहिल्या आठवड्यात रुग्णाला त्रास सुरु होतो. अशा त्रासाला WITHDRAWAL SYMPTOMS असे म्हणतात. अशावेळी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णावर उपचार केले जातात.
व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्तीस समजून घेवून, त्याला व्यसन सोडायची प्रेरणा दिली जाते.
शिवाय त्या व्यक्तीची परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता वाढवली जाते. दवाखान्यात भरती करणे हा रामबाण उपाय नाही हे जरी खरे असले, तरी या काळात रोग्याचे मनपरिवर्तन करण्यास मदत होते. पण सर्वात मुख्य म्हणजे सुरवातीच्या आठवड्यातच व्यक्तीला व्यसनी पदार्थ न मिळाल्याने जो त्रास होतो तो घरातील लोकांना बघवत नाही, अशा त्रासाला Withdrawal असे म्हणतात. हा त्रास रोग्याने सहन करणे भागच आहे. तज्ञ डॉक्टरच अशा रोग्याला हाताळू शकतात. व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला पूर्ण तपासले जाते. अगदी शारीरिक व्याधीपासून ते मानसिक व्याधीपर्यंत.
आवश्यकतेनुसार वैयक्तिक, कौटुंबिक, वैवाहिक सल्ला किंवा काऊन्सेलिंग केले जाते.
तसेच अशावेळी कुटुंबातील व्यक्तीने संबधित डॉक्टरना भेटत राहणे आणि रुग्णाबाबत आपल्याला माहित असलेल्या सगळ्या गोष्टी, सवयी, घटना स्पष्टपणे सांगणे गरजेचे असते.
रोग्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ‘आता बरा झाला आहेस आपल्या कामाला लाग’ अशी भुमिका मुळीच घेऊ नये. व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्ती केंद्रात आणि बाहेरही बरेच प्रयत्न करावे लागतात. कारण ‘व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे जादूची कांडी नसते, झाले उपचार की बदलला माणूस’ असं होत नसतं. व्यसनमुक्तीचा उपचार म्हणजे बदलाचा प्रारंभ. ‘चांगल परिवर्तन’ कसं घडवून आणायचं हे केंद्रात शिकवलं जातं. पण त्याची अमंलबजावणी कशी करायची ते कुटुंबीयांच्या हाती असतं . यथाअवकाश रुग्णाचे आत्मबल आणि आत्मविश्वास वाढीला लागेल. हाच आत्मविश्वास त्याच्या पुढील आयुष्याची पुंजी ठरणार आहे. त्याच्यात आत्मविश्वासाची चिन्हे दिसल्यानंतर त्याला आवडीचे काम करायला जरुर द्यावे. त्या व्यक्तीने आपल्या स्वकीयांच्या काळजीयुक्त प्रेमाच्या सावलीतच मोठा काळ काढणे आवश्यक आहे.
या बहुरुपी दुनियेच्या अनेक दैनंदिन समस्या स्वत:च्या बळावर सोडवण्यासाठी ती व्यक्ती खरोखर काही काळ पात्र नसते, हे सत्य ज्या रोग्याला कळेल तो खर्या अर्थाने सुदैवी.