व्यसन जाणून घेताना
- व्यसनाधीनता हा धूर्त, कावेबाज, हळूहळू वाढत जाणारा आणि जवळपास बर्याच जणांमध्ये कायमस्वरुपी राहणारा असा आजार आहे.
- व्यसनाधीनतेमधून बाहेर पडल्यानंतरची व्यसनमुक्तीची प्रक्रिया ही संथ व त्रासदायक अशी असते.
- स्वत:ला असलेल्या आजाराबाबतचा पूर्ण स्वीकार करणं, स्वत: आजारी असल्याचं मान्य करणं ही सुधारणेतील पहिली पायरी असते.
- प्रत्येक व्यसनी माणसाचा व्यसनमुक्त होण्याचा कालावधी वेगळा असतो. काही व्यक्तींना आजारावर नियंत्रण लवकर करता येते, तर काही व्यक्तींमध्ये चढउतार दिसून येतो.
- परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो कि जिथे व्यसनमुक्तीचा मार्ग मिळतो. तोपर्यंत कितीही प्रयत्न केले गेले तरी तो माणूस व्यसन सोडत नाही.
व्यसनमुक्तीचे सत्य मिळण्याचा क्षण – ROCK BOTTOM
व्यसनमुक्तीतील सत्याचा क्षण – ROCK BOTTOM, न गाठलेली व्यक्ती व्यसनाधीन असताना इतरांच्या समजावण्याने, प्रयत्नांनी काही प्रमाणात व्यसनापासून दूर राहते, पण पूर्णत: व्यसन कधीच सोडत नाही. परंतु त्याच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्यामुळे तो पुन्हा सुधारणेकडे वळतो. त्याचं आयुष्य बदलतं. ROCK BOTTOM जेव्हा गाठतो, तेव्हा त्याच्या आतापर्यंतच्या भ्रामक समजूती दूर होतात. ज्या व्यसनाधीनतेच्या कारणांचे तो समर्थन करायचा त्याऐवजी आपण कुठे चुकतो हे त्याला उमजतं. आपल्या चुका तो मान्य करतो व सुधारणेकडे वळतो. या क्षणापासून निरोगी आयुष्याची वाटचाल सुरु होते. परंतु एकदा का व्यसनमुक्तीचा प्रवास सुरु झाला की सुरवातीचा प्रवास हा संथ वाटतो, संपता संपत नाही असं वाटतं, पण नंतर मात्र तो गतिमान होतो.
सुरुवातीच्या काळात समुपदेशक व कुटुंबाचा आधार महत्वाचा असतो. काही जणांच्या आयुष्यात ROCK BOTTOM इतक्या उशिरा येतो, की घडलेल्या वाईट गोष्टींपेक्षा आणखी काही वार्ईट होणे जवळपास दुरापस्त / अशक्य असते. ROCK BOTTOM हा व्यसनी माणसांचा हार मानण्याचा क्षण असतो. जिथे आपण हार मानतो तिथे आपण जिंकण्यासाठी लढायला लागतो. ही लढाई आपलीच आपल्याशी आपल्या आत असते.