Denial / नकार
आपण करत असलेली चूक (व्यसन) अमान्य करणे किंवा त्याला ठाम नकार देणे म्हणजे DENIAL..
दारुचा प्रश्न नाकारण्यासाठी दिली जाणारी कारणे..
- एवढी जास्त नाही पित
- दारुड्यासारखी नाही पित
- इतरांमुळे पितो
- आज पासून नाही पिणार
- माझ्या पैशाची पितो
- मी केव्हापण बंद करु शकतो
- माझं काम पूर्ण करुन मगच पितो
- पिऊन मी इकडे तिकडे कुठेपण पडत नाही
- पिऊन मी दुसर्यांना त्रास देत नाही
- माझा माझ्यावर पूर्ण ताबा आहे
- घरातल्यांच्या त्रासामुळे पितो
- साहेब कटकट करतात
- मी फक्त पार्टीमध्ये पितो (मी सोशल ड्रिंकर आहे)..
- दारु सोडण्यासाठी मला हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची गरज नाही..
माझ्या व्यसनाची मी दिलेली कारणे..
- तणावमुक्त वाटायला लागलं, जीवन असह्य वाटतयं म्हणून थोडसं बर वाटायला सुरु केली नशा.
- झोप चांगली यायला हवी म्हणून थोडी थोडी घ्यायचो त्याने काही दारुडा किंवा व्यसनी होत नाही असं वाटलं.
- भूक चांगली लागायला पूर्वी ‘डॉक्टर्स’ दारु असायची, ती खूप औषधी असायची. घेतली औषधासारखी.
- मुलगा वारल्यावर दु:ख विसरायला लागणारं औषध म्हणून घेतली, बुडून गेलो.
- शारीरिक दुखणं वाढायला लागलं, डॉक्टरच्या गोळ्या घेऊन कंटाळा आला होता. सहज चरस घेऊन पाहिला, बरं वाटलं आणि सवय लागली.
- कंटाळवाण्या जीवनात विरंगुळा म्हणून घ्यायला लागलो, त्यामुळे मित्र पण मिळाले, बरं वाटायला लागलं.
- मित्रांबरोबर हसत खेळत सहज घेतली, आम्ही सगळेच एकत्रच घ्यायचो, शाळेत असताना दारु केवळ मैत्रीखात्यातच होती, वाटलं नव्हतं दारुडा होईन म्हणून.
- लहानपणी बाबांचे, काकांचे, मामांचे बघून वाटले काय हरकत आहे. पहिल्यांदा हळूच सिगारेट ओढली. मग दारु प्यायलो, पुढे वाहवत गेलो.
- आत्मविश्वास वाढवायला घेतली.
- एक नशा हवीच होती. वाटलं त्यामुळे हलकं वाटेल. नुसती सिगारेट ओढायला सुरुवात केली होती.
- फसविला गेलो, माहित नव्हतं नशा होईल म्हणून.
- प्रसाद म्हणून देवळातला पुजारीच भांग द्यायचा. तो आम्हा काही मुलांना स्वत: बरोबर बसवून घ्यायचा. मग सवय झाली. आम्ही सगळे चरसी झालो.
- भीड चेपायला पाहिजे. मैत्रिणीला प्रेमाबद्दल विचारताना पहिल्यांदाच घेतली आणि मग घेतच राहिलो.
- खूप थंडी होती, ऊब पाहिजे म्हणून थोडी थोडी घेतली. झोप पण बरी लागायला लागली. घेतच राहिलो.
- सांडपाण्यात गटारात काम करावं लागायचं. मग कंटाळा यायचा. तो घालवायला इतर मित्रांनी घ्यायला लावली. म्हणाले याच्याशिवाय हे काम होणार नाही.
- मित्रमंडळींनी अन्न द्यायच्या ऐवजी दारुच द्यायला सुरुवात केली. भूकेचा विचारही मग दूर गेला आणि परिस्थितीचा विचार करायला विसरलो.
- पैसे कमवायचे होते. ड्रग्ज विकून किंवा इकडे तिकडे पोहचवून पैसे मिळतात, ते करताना ड्रग्ज घ्यावा लागतो. मग आपला कोणी संशय घेत नाही. नोकरी सुरक्षीत राहते.
- सगळीच वस्ती दारुडी होती. लोक चिडवायला लागले. नामर्द म्हणायचे मग घेतली आणि त्यांच्यात मिसळलो. त्यांच्यातलाच दारुडा झालो.
- खूप दुखणे होते, डॉक्टरांनी पेथीडीन दिले, दुखणे कमी झाले पण व्यसन लागून राहिले.
- साधुंबरोबर जायचो त्यांची शांती बघितली. ते तासनतास शांत बसायचे स्वत:ला ती शांती हवीशी वाटली म्हणून त्यांच्यासारखा चरस घेतला.
- चिक्कार पैसा होता. समाजात पत दाखवायची म्हणून उंची दारुच्या पार्ट्यांना सुरुवात केली आणि स्वत: दारुडा झालो.
- एकाकी असतो, कळत नाही काय करायचे वेळ कसा घालवायचा, मग दारु पित बसतो. आधीची तुरळक सवय होती. आता स्वत:ला विसरतो.
- बायको आणि आईचे इतके भांडण होत राहते की मी घरातून निघून जातो. कंटाळून दारु पितो मग तिकडे लक्ष जात नाही.
- माझा स्वभाव इतका चिडका की कोणाशी पटेना. रागाने मुलाने दारु आणून दिली आणि झोपून रहा म्हणून सांगितले घेतली आणि असा बेवडा झालो.
- अपघातात पाय गेला आणि खूप दु:खी झालो. त्यातच गांजा घ्यायला लागलो.
- नशेत राहायला शिकलं की मन:स्थिती बदलते. खूप शहाण्यासारखा विचार करुन वेडा होण्यापेक्षा नशेत हरवून जायचे ठरविले.
- नोकरी गेली खूप कर्ज झाले. दारु प्यायला लागलो म्हणजे मग या त्रासदायक गोष्टींकडे लक्षच नाही जायचे. स्वत:चा अपमान पण कळत नाही.
- भावाने संपत्तीत फसविले मला. खूप वाईट वाटले, राग आला, विसरता येईना, उदास वाटले म्हणून दारु प्यायला लागलो.
- बायकोने आईच्या रागाने माझ्यावर व आईवर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पकडून नेले. आल्यावर खूप लाज वाटली म्हणून दारु प्यायला लागलो, तो कायमचा.
- मिल बंद झाली. सगळं भविष्य अंध:कारमय झालं. खूप घाबरलो. रोजचा दिवस जगणं जड वाटू लागलं. घरची केविलवाणी स्थिती झाली. दारु प्यायला लागलो.
- सगळे मित्र एकत्र जमून घेतो.
- पैसे खायला शिकलेलो. काळा पैसा, संपत्ती वाढत होती, पण मन विचलित झालं पटलं नाही. दारु प्यायला सुरुवात केली. बेवडा झालो.
- रिक्षा चालक झालो. नवखा होतो आणि इतर ड्रायव्हरनी मला आपल्या कळपात गर्दचा दम मारुन सामील करुन घेतलं.
- मला नोकरी नाही, बायको कमावते. लाज वाटते, राग येतो. सरळ वस्तीतल्या दारुड्यांशी दोस्ती केली. दारुडा झालो.
- तंबाखू मळायला आजीबरोबर सुरुवात केली, सवय झाली. त्याशिवाय जमत नाही मला.
- बघावं तेव्हा मरायचे विचार यायचे, कळायचं नाही काय करायचं. चरस घ्यायला सुरुवात केली आणि बेधुंद झालो.
- अभ्यास करायला जमत नव्हता नापास होत राहिलो सिगारेट फुकायला सुरुवात केली अस्वस्थता कमी व्हायची.
- एकटेपणाची भिती वाटायची. मग दारु प्यायला लागलो भिती आठवायची नाही. दारु सुरुच ठेवली.
- खूप राग यायचा, कंट्रोल व्हायचं नाही म्हणून सिगारेट ओढायला लागलो थोड्या दिवसांनी दारुही प्यायला लागलो.
- प्रेमभंग झाला व देवदास झालो. म्हणजे त्याचा सिनेमा बघितला आपण त्याच्या सारखेच आहोत असं वाटलं आणि आता तसाच झालो.
- हातून काहीच चांगलं घडत नव्हतं सारखं उदास वाटायचं सुरुवातीला बियर घेतली आणि मग दारुत गुंतलो.
- घरात सकाळ संध्याकाळ भांडणं आणि मारामारी. पेग मारायचो तरच घरी जाऊन राहू शकत असे.