नमस्कार! ओळखलंस का मला ? A Letter to an alcoholic

नमस्कार!
मला वाटतं तू मला ओळखतोस… का विसरलास रे मित्रा?
मी ‘‘तो’…
जो देवाला पण न मानणारा आणि तू ज्याला अतिंद्रीय शक्ती म्हणतोस त्यालाही न जुमानणारा
मी ‘‘तो’’…
जो तुझ्या ए.ए. मिटिंगची पण घृणा करणारा
मी ‘‘तो’’…
ज्याच्या संपर्कात आल्यावर हळूहळू तुझ्या शारीरिकतेत, मानसिकतेत खिंडार पाडणारा आणि कदाचित तू ‘‘नशीबवान’’ असलास तर ह्या सगळ्यातून तुझी मृत्यूसाठी सुटका करणारा.आठवलं का रे मित्रा ‘‘मी’’ कोण???

‘‘मी’’ म्हणजे व्यसनाधीनतेचा आजार.
एक धूर्त, कावेबाज पण ताकदवान आजार.

मित्र – मित्र म्हणून ‘‘मी’’ आत्तापर्यंत तुझ्यासारख्या कित्येकांना ठार मारलंय आणि ते करण्याआधी त्यांचे हाल हाल करुन त्यांची क्रूर चेष्टासुद्धा केली आहे. आता माझ्या मैत्रीत तुझा नंबर लागलाय. आता ‘‘मी’’ काय करणार माहित आहे का तुला? आता अचानक एका ओल्या पार्टीत मी तुला गाठणार. मला तू खूप आवडतोस आणि ‘‘मी’’ तुझा सगळ्यात चांगला बेस्ट फ्रेंड आहे असं ढोंग करणार. माझे काही घोट तू घेतलेस की तुला हलकं हलकं वाटेल. आता ‘‘मी’’ तुझाच झालेलो असेन आणि आता बघ तुला आठवतंय का?

जेंव्हा गोष्टी तुझ्या मनासारख्या होत असतात. नवीन घर, मोठी नोकरी, पहिली गाडी, वाढदिवस, धम्माल पार्टी आणि खूप काही. आपण दोघे हातात हात घालून जीवनात आलेले चार सुखाचे क्षण सुद्धा मातीत घालवतो. आपण मस्त पैकी चांगल्या जीवनाची राख रांगोळी करतो. तू जेंव्हा जेंव्हा एकटा होतास तेंव्हा तेंव्हा तुझ्या हातात हात घालून मीच असायचो की नाही?

बघ आठवतंय का?

जेंव्हा जेंव्हा तू आजारी पडायचास, जेंव्हा जेंव्हा तू रडायचास, अगदीच टोकाचं म्हणजे जेंव्हा जेंव्हा तुला हे शरीर सोडून जावं असं वाटयचं तेंव्हा कोण होतं रे तुझ्या बरोबर?

‘‘मीच” की नाही!

पण मित्रा मनापासून एक खर सांगू का तुला. मला बुवा जाम आवडतं. जेंव्हा तुझे हात पाय थरथर कापतात, डोकं दुखतं, पोटात दुखतं, तुला सहन होत नसलेला ताण येतो. तुला गटारात पडलेला बघताना, इकडे तिकडे गडाबडा लोळताना पाहून मला तर बाबा जाम मजा येते.

पण त्याही पेक्षा मला चांगले कधी वाटते माहिती आहे तुला?

जेंव्हा तू दोन चार घोटातच चेतनाशून्य होतोस ना तेंव्हा.

जेंव्हा तू कोणाला मारु पण शकत नाहीस आणि स्वत:वर रडू पण शकत नाहीस.

तुला अशा परिस्थितीत बघायला खूपच मजा येते.

माझी तर हीच इच्छा आहे की आणखी बरेच दिवस तुला असंच छळत रहावं.

पण तू माझा मित्र आहेस ना म्हणून तुला आणखीन एक खरं सांगतो, मी कितीही वाईट, क्षुद्र, दगडाच्या काळजाचा, घाणेरडा आजार जरी असलो ना तरीही बोलावल्याशिवाय ‘‘कोणाच्याच’’ संसारात ‘‘मी’’ जात नाही.

एवढे लक्षात ठेव ‘‘मी’’ माझ्या शब्दाचा एकदम पक्का आहे.  तू मला कळत नकळत बोलावतोस आणि मग मात्र ‘‘मी’’ तुझ्याकडे तुझ्या इच्छे विरुद्धसुद्धा तुझ्याच घरात ठाण मांडून बसतो. लक्षात ठेव ‘‘मी’’ संपेपर्यंत तुझा हात कधीच सोडणार नाही. आपण मित्र आहोत म्हणून तुला ‘‘मी’’ एक विनंती करतो की आपल्या दोघांमधे देवाला, शांतीला, प्रेमाला, चांगलं व योग्य सांगणार्‍या देवमाणसांना अजिबात थारा देऊ नकोस. ही मंडळी आपल्या दोघांच नातं फार कमजोर करतात. आपण हातात घेतलेले हात सोडून द्यायला लावतात. जी लोकं ‘बारा पायर्‍यांचा कार्यक्रम’ करतात त्यांचा ‘‘मी’’ दु:स्वास करतो. ‘‘मी’’ तुझी देवपूजा, तुला माझे माझे म्हणवणारे चांगले मित्र आणि तुझे नातेवाईक यांची खूप घृणा करतो. ह्या सगळ्यांमुळे माझी ताकद कमी होते रे मित्रा. मग ‘‘मी’’ नीट काम नाही करु शकत. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांमुळे ‘‘मी’’ तुझ्या जवळ पण राहू शकत नाही. त्यांच्यामुळे ‘‘मी’’ माझा प्रभाव, माझी जादू तुझ्यावर बिलकुल करु शकत नाही. पण लक्षात ठेव ह्यांच्या नजरेतून तू बाहेर पडलास तर ‘‘मी’’ शांतपणे आणि संयमाने बाहेरच्या दुनियेत तुझी वाट बघतोच आहे.

पुढच्या वेळेला भेटू तेंव्हा कदाचित तुझी कंडिशन आणखीन खराब झालेली असो हीच इच्छा.
अरे बघ पत्र लिहिता लिहिता खूपच उशीर झाला. तुला माझ्याकडे यायला वेळ लागणार असेल तर तोपर्यंत ‘‘मी’’ मला दुसरा ‘मित्र’ शोधतो. पण तुझी वाट मात्र मी कायमच पाहत राहीन.
तुझीच वाट पाहणारा ‘‘मी’’
तुझाच मित्र…
‘‘व्यसनाधीनतेचा आजार’’